पुणे : राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी उसाची एफआरपी देण्यास असमर्थ ठरलेल्या १३ साखर कारखान्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील साखर कारखान्यांनी ऊसाची एकूण २३०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कारवाई झालेल्या १३ कारखान्यांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ७, उस्मानाबाद आणि सांगली जिल्ह्यातील २, औरंगाबाद आणि बिड जिल्ह्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या हंगामात पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई आहे.
कारवाई झालेल्या १३ कारखान्यांकडे एकूण ५५६.७५ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याकडील साखर विक्री करून ही रक्कम वसूल केली जाईल.
कारखान्यांनी ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसांत त्याचे पैसे देणे अनिवार्य आहे. यात जर कारखाने अपयशी ठरले तर त्यांची संपत्ती जप्त करुन थकबाकी देण्याची तरतूद आहे. गेल्या हंगामात अशा प्रकारच्या कारवाईपासून कारखान्यांना वाचविण्यात आले होते. मात्र या हंगामात सुरूवातीपासून संथ असलेल्या साखर विक्रीमुळे कारखान्यांना अडचणीत आणले आहे. त्यामुळे साखर उद्योगही अडचणीत आले आहेत.