पुणे : महाराष्ट्र राज्यात साखर कारखान्यांचा ऊस गळीत हंगाम जोमात सुरू आहे. ऊस वाहतूक करताना बरेचदा बैलगाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त उसाचा भार लादून, बैलांना क्रूर पद्धतीने वागणूक दिली जाते, असे वास्तव ठिक-ठिकाणी रस्त्यांवर दिसते. बैलांकडून क्षमतेपेक्षा जास्त ऊस वाहतूक करून घेऊन, त्यांना क्रुर वागणूक देणाऱ्यांविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश साखर आयुक्तालयाकडून साखर कारखान्यांना देण्यात आले आहेत.
श्रीरामपूर येथील प्रेरणा फाऊंडेशनच्या पल्लवी आल्हाट यांनी याप्रकाराबाबत साखर आयुक्त व पशुसंवर्धन आयुक्तांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेवून, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसह जिल्हाधिकारी तथा जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी, प्रादेशिक साखर सह संचालक, राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक यांना याप्रकाराबाबत तावरे यांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
बैलगाडीमधून ऊस वाहतूक करताना बैलांना क्रूरतेने छळू नये, बैलांवर क्षमतेपेक्षा जास्त वजन लागू नये. सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर पशुधनाची पायी ने-आण करू नये. जखमी, आजारी कुपोषित किंवा जास्त वयाच्या बैलांचे स्वास्थ्य उचित रहावे, यासाठी त्यांना सक्तीची विश्रांती द्यावी. जनावरांवर ९ तासांहून अधिक वेळ वाहतूक लादू नये. दुपारी १२ ते ३ या वेळेत त्यांना विश्रांती द्यावी. खाण्यापिण्यासाठी चार किलोमीटरच्या पलिकडे प्राण्यांची ने-आण करु नये, अशा सूचना साखर आयुक्तांनी महाराष्ट्रातील खासगी व सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांसह सरव्यवस्थापकांना दिल्या आहेत.