पुणे : राज्यातील सर्व प्रादेशिक साखर सहसंचालकांनी स्वतः व त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत कार्यक्षेत्रातील सर्व कारखान्यांची तपासणी करण्याचा आदेश साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. केंद्र सरकारने दर तीन महिन्यांनी सर्व साखर कारखान्यांतील साखरेच्या साठ्याची प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार साखर साठा तपासणी करून अहवाल सहसंचालकांनी आयुक्तालयात पाठवावा, असे निर्देश साखर आयुक्तांनी दिले आहेत.
यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यांकडून विनापरवाना गाळप सुरू केले जाणार नाही, यासाठी आपापल्या क्षेत्रात सहसंचालकांनी काळजी घ्यावी. विनापरवाना ऊस गाळप हंगाम सुरू केला असेल तेथे पंचनामा करून व्हिडिओ शूटिंग करावे आणि दंड लागू करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत.
सर्व प्रादेशिक साखर सहसंचालक, विशेष लेखापरीक्षकांना प्रत्यक्ष तपासणीवेळी टॅगिंगद्वारे साखर, मोलॅसिस, प्रेसमड, इथेनॉल इत्यादींच्या विक्रीतून वसुली, परतफेड केली जात आहे काय याचीही तपासणी करावी. टॅगिंग झाले नाही तर संबंधित प्रादेशिक साखर सहसंचालक व विशेष लेखापरीक्षकांना जबाबदार धरले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना गेल्या हंगामात एफआरपी पूर्णपणे दिली आहे काय याची पडताळणी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.