जळगाव : खानदेशात गेल्या दोन वर्षांत पांढऱ्या माशीचा उद्रेक पाहता उसाची लागवड कमालीची खालावली होती. चोपडा तालुक्यात तर हे प्रमाण निम्म्यावर आले आहे. अडावद, मंगरूळ व गलंगी, गणपूर गटात लागवड २० टक्क्यांवर आली. सद्यःस्थितीला तालुक्यात १,६०० एकरांवर ऊस आहे. दोन वर्षांचा कालावधी गेल्यानंतर नवीन ऊस बेणे व रोपांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे. ऊस लागवडीला या महिन्यापासून सुरुवात झाली आहे. स्थानिक बेणे वापर सुरू असून काही शेतकरी उसाची रोपे आणून लागवड करीत आहेत.
पांढऱ्या माशीचा उपद्रव गेल्या दोन वर्षांत थोडाफार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा उसाकडे वळण्याची इच्छा दिसू लागली आहे. तालुक्यातील विविध नर्सरींमध्ये साधारणपणे दोन रुपये तीस पैशांपासून ते तीन रुपये पंचवीस पैशांपर्यंत वेगवेगळ्या वाणांची उसाची रोपे उपलब्ध झाली आहेत. खानदेशात जवळपास सर्वत्र चार फुटांची सरी सोडण्याची पद्धत आता रूढ झाली आहे. बेणे लागवडीसाठी एक डोळा, दोन डोळा, व तीन डोळे पद्धतीचा वापर शेतकरी करीत आहेत. तर ऊस रोप दोन फुटांवर लागवड करून त्याला फुटवे आल्यावर त्यापासून चांगले उत्पादन येत असल्याचे अनुभव आहेत.