मुंबई : महाराष्ट्राच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेआधी पेरणी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे विभागाने शेतकऱ्यांना बियाणे वाया जाऊ नये यासाठी आपल्या परिसरात ८० मिमी ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करण्याच सांगितले आहे. आगामी हंगामासाठी शेतीची कामे करण्यात शेतकरी गुंतले असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग आला आहे.
कृषी विभागाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी सोयाबिन, कापूस, मक्क्यासह इतर पिकांची पेरणी करू नये. वेळेआधी पेरणी केल्यास पुरेसा ओलावा नसल्याने पिकाची उगवण कमी होण्याचा धोका आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनची उगवण होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. त्याचे कारण जमिनीत ओलावा नसल्यामुळे तसे घडले होते. महाराष्ट्रात ४० लाख हेक्टरमध्ये कापूस आणि सोयाबीनची लागवड होण्याची अपेक्षा आहे. तूर, उडीद, मुगसारख्या डाळींचे लागवड क्षेत्र २० लाख हेक्टर असेल. ऊस या महत्त्वाच्या नकदी पिकाची लागण १० लाख हेक्टर क्षेत्रात होऊ शकते.
गेल्या काही दिवासांपासून राज्याच्या अनेक भागात भारी ते मध्यम श्रेणतील पाऊस झाला आहे. कोकण, मराठवाडा, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागात तुरळक पाऊस झाला आहे. मॉन्सून मंगळवारी केरळच्या किनारपट्टीवर पोहोचला. पुढील काही दिवसात तो महाराष्ट्रात पोहोचण्याची अपेक्षा आहे. भारतीय हवामान विभागाने यावर्षी सामान्य पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.