कोल्हापूर : शेतकऱ्यांनी रासायनिकऐवजी सेंद्रिय शेती करण्याला प्राधान्य देण्याची गरज असून त्यांनी कृषिपूरक व्यवसायाकडे वळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावून अन्नधान्याबाबत महाराष्ट्र स्वयंपूर्ण व्हावा, राज्यातून शेतमाल निर्यात वाढावी, यासाठी लवकरच राज्य शासन नवीन कृषी धोरण आखणार आहे असे प्रतिपादन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले. शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी आयोजित केलेल्या प्रगतिशील शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. शेतकऱ्यांना बोगस औषधे देऊन फसवणूक करणाऱ्या कंपन्यांकडून नुकसानभरपाई वसूल करून ती संबंधित शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही कोकाटे यांनी यावेळी सांगितले.
शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या विविध कृषीविषयक स्टॉलला मंत्री कोकाटे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. ऊस, द्राक्षे, भातपीक, नाचणी, डाळिंब, बांबू, हळद, काजू, आंबा, ड्रॅगन, नर्सरी आदी पिकांच्या बाबतीत येणाऱ्या अडचणींची माहिती घेतली. विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. ऊस तज्ज्ञ संजीव माने व डॉ. अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन केले. खासदार धैर्यशील माने, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्तालयाचे (पुणे) सहसंचालक रविशंकर चलवदे, सहायक संचालक (संशोधन) डॉ. अशोक पिसाळ, ‘रामेती’चे प्राचार्य बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिदंर पागरे, सांगलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार, आदी उपस्थित होते.