पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राज्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. यंदा ६ हजार उस उत्पादक शेतकऱ्यांना एकरी १०० टन खोडवा उसाचे उत्पादन काढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, अशी माहिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू कर्नल डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली. जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने कृषी महाविद्यालय पुणे येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. विद्यापीठाच्या पुण्यातील कृषी महाविद्यालयाचा मृद विज्ञान विभागाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. येथील माती आणि पाणी परिक्षण प्रयोगशाळा अत्याधुनिक करण्यात आली आहे. मृद विज्ञान विभागाच्यावतीने जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भुमाता पुजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कुलगुरु कर्नल डॉ. पी. जी. पाटील म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी कृषी विद्यापीठाने मोठे काम केले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्यातील साखर कारखान्यांच्या माध्यमातून तंत्रज्ञान प्रचार-प्रसार करण्यासाठी विविध सामंजस्य करार केले आहेत. बँकेच्या माध्यमातून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पर्यावरणपूरक एकरी १०० टन खोडवा ऊस व्यवस्थापन प्रकल्प महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि सातारा जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांच्या सहकार्याने ३०२२ शेतकऱ्यांच्या शेतावर राबविला आहे. प्रकल्पामध्ये माती व पाणी परिक्षण आधारित एकरी १०० टन खोडवा ऊस उत्पादनासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे. हा देशातील पथदर्शी आणि अत्यंत महत्त्वकांशी उपक्रम आहे. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र माजी विभाग प्रमुख डॉ. जे. डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने यांनी प्रास्ताविक केले.