कोल्हापूर : कर्नाटक शासनाने यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरू करावा, असा आदेश काढला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील गळीत हंगाम कधी सुरू होणार ? याची उत्सुकता लागली आहे. राज्यातील यंदाचा गळीत हंगाम एक नोव्हेंबरनंतर सुरू केल्यास कारखान्यांना नियोजन करणे सुलभ होईल, असा सूर कारखाना वर्तुळातून निघत आहे. गेल्यावर्षी अंतिम टप्प्यात कारखान्यांनी ऊस नेण्यासाठी उत्पादकांना आटापिटा करावा लागला, हा अनुभव पाहता हंगाम लवकर सुरू झाल्यास ऊस तोडणीच्या दृष्टीठनेही ते महत्त्वाचे ठरेल, असाही मतप्रवाह आहे.
यंदा कर्नाटकचा हंगाम थोडा उशिरा सुरू होणार असल्याने महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील ऊस कर्नाटकातील कारखान्यांना लवकर जाण्याची शक्यता कमी आहे. दरवर्षी कर्नाटकातील हंगाम महाराष्ट्रापेक्षा लवकर सुरू होतो. त्याचवेळी सीमा भागात ऊस दर आंदोलनामुळे हंगाम ठप्प असतो, याचा फायदा घेत कर्नाटकातील कारखाने महाराष्ट्रातील उसाचे गाळप करतात असे चित्र असते. यंदा मात्र परिस्थिती वेगळी असू शकते. येत्या दोन महिन्यांचा काळ हा निवडणुकीचा असल्याने मंत्री समितीने तातडीने बैठक घेऊन गळीत हंगाम सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे. सुरुवातीला पाण्याची टंचाई आणि पावसाळ्यात चांगल्या पावसामुळे उसाचे नेमके किती उत्पन्न निघेल याबाबत साशंकता आहे. गेल्याच दोन-तीन वर्षांपूर्वीचा अंदाज आणि प्रत्यक्षात ऊस तोडणी सुरू होतानाचे उत्पन्न यात मोठा फरक जाणवला. यामुळे यंदा उसाचे उत्पादन किती वाढेल याचा नेमका अंदाज अजून कारखाना पातळीवरही आलेला नाही.