कोल्हापूर : आतापर्यंत राज्यात आडसाली उसाच्या एक लाख ९३ हजार ५७२ हेक्टर म्हणजेच सरासरी १८ टक्के लागवडी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी ७६ हजार ७६५ हेक्टरने आडसाली लागवडीत घट झाली आहे. अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार राज्यात उसाचे सरासरी १० लाख ९५ हजार ७५ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यासाठी मागील पाच वर्षांचे लागवडीचे क्षेत्र गृहित धरण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या वर्षी याच काळात दोन लाख ७० हजार ३३७ हेक्टरवर लागवड झाली होती.
यंदा जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. काही ठिकाणी कमी कालावधीत अधिक पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रात व घाटमाथ्यावर पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे पुणे, नाशिक, कोल्हापूर विभागातील कोयना, मुळा, भंडारदरा, कुकडी, भाटघर, उजनी अशी लहान मोठी असलेली बहुतांशी धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे धरणाच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी शाश्वत पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या जोरदार पावसामुळे वाफसा न झाल्याने ऊस लागवडीत घट झाल्याचे चित्र होते. परंतु वाफसा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आडसाली उसाच्या लागवडीला चांगलाच वेग आला. त्यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामात उसाच्या लागवडी करतात. दरवर्षी बहुतांशी शेतकरी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्ट या दरम्यान करतात. पूर्वहंगामी उसाच्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेबर या कालावधीत करतात. तर १५ जानेवारी १५ फेब्रुवारी या काळात सुरू उसाच्या लागवडी शेतकरी करतात. लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यानी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात.
पुणे विभागात उसाचे एकूण सरासरी तीन लाख ४३ हजार ३९२ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ९८ हजार १८६ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. कोल्हापूर विभागातील सातारा जिल्ह्यात सर्वाधिक आडसाली उसाच्या लागवडी झाल्या आहेत. विभागात ४ लाख २० हजार ५८९ हेक्टरपैकी सुमारे ६४ हजार ३१८ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर विभागातील धाराशिव, परभणी, हिंगोली, अमरावती विभागातील बुलडाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, नागपूर विभागातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत अत्यल्प प्रमाणात ऊस लागवडी झाल्या आहेत.