सोलापूर : कोरोना वायरस महामारीच्या कचाट्यात शेतकरी पुरता हतबल झाला आहे. दुष्काळ, पूर आणि आता लॉकडाउनमुळे त्याचे कंबरडेच मोडले आहे. अशात ऊस पिकाकडेच तो डोळे लावू बसला असताना ऊस तोडणीच्या मजुरांचा एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनाच्या भितीने मजुर कामावर परतले नाही तर काय…? यामुळेच कारखानदार अणि शेतकरी यंदा हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणीसाठी पुढे आले आहेत. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात 50 राज्यातील बाकी जिल्ह्यातून 50 अशा 100 हार्वेस्टर मशिन्सचे बुकींग झाले आहे.
सिद्धनाथ शुगरचे दिलीप माने म्हणाले, हार्वेस्टरच्या माध्यमातून ऊस तोडणीसाठी आम्ही पुढे आलो आहोत. सध्याच्या अडचणीच्या काळात ऊस तोडीच्या टोळ्यांना रोजगार मिळावा यासाठी सिद्धनाथ आणि कंचेश्वर साखर कारखान्याने हार्वेस्टर च्या माध्यमातून ऊस तोडीचे नियोजन केले आहे.
सध्या महाराष्ट्रात शक्तीमान आणि न्यू हॉलंड या दोन कंपन्यांचे हार्वेस्टर मशिन उपलब्ध आहेत. यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यात 10 लाख 66 हजार हेक्टरमध्ये ऊस आहे. अर्थातच 815 मेट्रीक लाख टन ऊस गाळपाचे नियोजन साखर आयुक्त कार्यालयातर्फे करण्यात आले आहे. महारष्ट्रात सोलापूर, कोल्हापूर, नगर, सांगली, सातारा, पुणे या साखर पट्ट्यात मराठवाडा आणि नगर जिल्ह्यातील ऊसतोड कामगार मोठ्या प्रमाणावर जातात.
यावेळी बोलताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊस तोडणी कामगार महामंडळाचे माजी अध्यक्ष केशव आंधळे म्हणाले, 15 लाख ऊस तोडणी कामगार राज्यात आहेत. त्यापैकी 30 किंवा 40 टक्केच कामगार कामावर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ऊसतोडणीसाठी हार्वेस्टर हा उत्तम पर्याय ठरलेला आहे.
हार्वेस्टर या ऊसतोडणी यंत्राची किंमत एक कोटी वीस लाख रुपये इतकी आहे. यासोबत दोन ट्रॅक्टर, एक मशिन आणि दोन इन फिल्डर मिळतात. हे मशिन घेण्यासाठी बँक आर्थिक सहकार्य करण्याचे धाडस करत नसल्याचे दिसत आहे. यामुळे कारखानदारांसमोरचे संकट अधिक बिकट होत आहे. त्यांच्या समोर उभ्या असलेल्या आर्थिक संकटातून त्यांना मार्ग काढावा लागत आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.