पुणे : ऊस तोडणी हार्वेस्टर मालकांनी २०१७ पासून प्रलंबित अनुदान, ऊस तोडणीसाठी ७०० रुपये दरवाढीसह विविध मागण्यांसाठी साखर संकुलासमोर आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीनरी मालक संघाने साखर संकुलमध्ये तीन दिवसीय आंदोलनाला सुरुवात केली. जर राज्य सरकारने आम्हाला थकीत बिले अदा केली नाहीत, तर आम्ही सर्व मशीन मालक प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आपली मशीन लावू, असा इशारा संघटनेचे सचिव अमोलराजे जाधव यांनी दिला. ते म्हणाले की, यााबबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री, विरोधी पक्षनेते तसेच सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांना यापूर्वीच निवेदने दिली आहेत.
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी मशीन मालक संघटनेचे अध्यक्ष संजय साळुंखे, उपाध्यक्ष प्रभाकर भिमेकर, सचिव अमोलराजे जाधव, गणेश यादव, युवराज पाटील हे आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत. कोल्हापूर, सातारा, लातूर, बीड, नांदेड, सोलापूरसह महाराष्ट्रातील ८०० हून अधिक ऊस तोडणी मशीन मालकांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे.
साळुंखे यांनी सांगितले की, २०१७ मध्ये अनुदानापासून वंचित राहिलेल्या मशीन मालकांना योजनेचा लाभ दिला जावा. ते म्हणाले की, जर एखाद्या मशीन मालकांनी कोणतीही पतसंस्था अथवा वित्तीय कंपनीकडून कर्ज घेतले असेल, तर त्यालाही लाभ मिळाला पाहिजे. या मशीनसाठी गुंतवणुकीची रक्कम १४ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. आणि त्यास ४० टक्के अनुदान दिले पाहिजे. जाधव म्हणाले की, आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत. केवळ शाब्दिक खेळ करुन टाळाटाळ केली जात आहे.
केंद्र व राज्य सरकारांच्या सहयोगाने सुरू झालेल्या विविध योजनांतर्गत तोडणी मशीनच्या माध्यमातून २०११ व २०१२ मध्ये ऊस तोडणी सुरू करण्यात आली होती. यासाठीची अनुदान योजना २०१७ पर्यंत सुरू करण्यात आली. जाधव यांनी सांगितले की, या वर्षातील ८६८ मशीन अनुदानापासून वंचित आहेत. मात्र, सरकारने हा मुद्दा गांभीर्याने घेतलेला नाही. आम्ही वेळोवेळी सरकारसमोर आमच्या मागण्या मांडल्या आहेत. मात्र, सरकारने त्यावर लक्ष दिलेले नाही असा आरोप त्यांनी केला.