कोल्हापूर : कमी पाऊस आणि पाण्याच्या उपलब्धतेअभावी राज्यातील ऊस क्षेत्रात यंदा जवळपास १० ते १५ टक्क्यांनी घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात दरवर्षी १५ ते १६ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड होते. यंदा साखर कारखान्यांना १४.८७ लाख हेक्टर क्षेत्रांवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध झालेला आहे. पुढील गळीत हंगामात अनेक साखर कारखान्यांना उसासाठी धावाधाव करावी लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी राज्यात पावसाचे प्रमाण कमी होते. सरासरीपेक्षा केवळ ८६ टक्के पाऊस झालेला आहे. त्यामुळे ऊस उत्पादन घटले आहे.
राज्यातील सर्व साखर कारखान्यांना मिळून एका गळीत हंगामात सरासरी १० ते १२ कोटी टन उसाची आवश्यकता भासते. यंदा त्यात दीड ते दोन कोटी टनांनी घट अपेक्षित आहे. पुढील गळीत हंगामात उसाला प्रतीटन ३५०० किंवा त्यापेक्षा जादा दर मिळण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख ऊस पट्ट्यात जिल्ह्यात पावसाचे प्रमाण ५० ते ७५ टक्क्यांच्या आसपासच आहे. या भागात आडसाली उसाच्या लागवडीचे क्षेत्र जवळपास १० टक्क्यांनी कमी झालेले दिसत आहे. यंदा अंदाजे १३ लाख हेक्टरमध्ये ऊसाची लागवड झाली आहे. तर १.५ ते २ लाख हेक्टरची कमतरता भासण्याची शक्यता आहे.