सांगली : महाराष्ट्रात उसाला एकसारखा दर नाही. महाराष्ट्रात काही कारखाने तीन हजारापेक्षा जास्त दर देतात, तर काही कारखाने अडीच हजारापर्यंत दर देतात. तर याच देशातील गुजरात आणि तामिळनाडूत टनाचा दर चार हजारापर्यंत आहे. यातही कारखाने उपपदार्थातील नफा देत नाहीत. त्यामुळे संपूर्ण देशातील कारखान्यांनी टनाला पाच हजार दर शेतकऱ्यांना दिला पाहिजे, अशी मागणी घेऊन कोल्हापूरमध्ये दि. २७ रोजी ऊस परिषद घेण्यात येणार आहे. ऊस उत्पादक संघर्ष समितीच्या येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कामगार भवन येथे झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी किसान सभेचे राज्य अध्यक्ष उमेश देशमुख होते.
बैठकीस सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, परभणी, अहिल्यानगर येथील शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत ‘एक देश एक दर’ ही टॅगलाईन करून शेतकऱ्यांना एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले उपस्थित राहणार आहेत. बैठकीस प्राचार्य ए. बी. पाटील, अमोल नाईक, (कोल्हापूर), माणिक अवघडे (सातारा), सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी (सोलापूर), गुलाब मुलाणी, रमेश पाटील, जयवंतराव सावंत, राजेंद्र वाटकर (सांगली) यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.