पुणे: राज्यात यंदाच्या हंगामात चार मार्चअखेर २०० साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. यापैकी एकूण १०२ साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम समाप्त केला आहे. आतापर्यंत साखर कारखान्यांनी ८१४.९२ लाख टन उसाचे गाळप केले आहे. त्यापासून ७६४.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.३८ टक्के इतका आहे. राज्यात कोल्हापूर विभागाने सर्वाधिक ११.०१ टक्के साखर उतारा मिळवला आहे. विभागातील ४० कारखान्यांनी १९८.५८ लाख टन उसाचे गाळप केले असून, २८१.६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. विभागातील २२ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपुष्टात आला आहे.
पुणे विभागातील ३१ पैकी १२ कारखान्यांचे गाळप समाप्त झाले आहे. विभागात १९१.०६ लाख टन उसाचे गाळप झाले असून साखर उत्पादन १८१.३३ लाख क्विंटल झाले आहे. साखर उतारा सरासरी ९.४९ टक्के आहे. तर सोलापूर विभागातील ४५ पैकी ४१ कारखाने बंद झाले आहेत. कारखान्यांनी आतापर्यंत १२९.८५ लाख टन उसाचे गाळप करून १०५.१९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. विभागाचा साखर उतारा ८.१ टक्के आहे. अहिल्यानगर विभागात २६ पैकी ६ कारखाने बंद झाले आहेत. विभागातील कारखान्यांनी ८.७७ टक्के साखर उताऱ्याने १०८.७६ लाख टन उसाचे गाळप करून ९५.४२ लाख क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात २२ कारखान्यांनी ७.९२ टक्के साखर उताऱ्याने ७८.५५ लाख टन उसाचे गाळप करून ६२.१३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. नांदेड विभागातील २९ पैकी ११ कारखाने बंद झाले असून त्यांनी ९४.९४ लाख टन उसाचे गाळप केले आहे. अमरावती विभागात ४ पैकी एक कारखाना सुरू आहे. तर नागपूर विभागात ३ कारखान्यांनी २९८ लाख टन उसाचे गाळप करून १.५३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.