पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता डिजिटायझेशनची आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यादृष्टीने साखर संचालक राजेश सुरवसे यांनी सर्व सहकारी, खासगी कारखान्यांना ऊस नोंदणीची माहिती ऑनलाइन भरणे बंधनकारक केले आहे. ही माहिती साखर आयुक्तालयाने विकसित केलेल्या ‘महा ऊसनोंदणी’ पोर्टलवर भरायची आहे. कारखान्यांनी २०२४-२५ गाळप हंगामासाठी त्यांच्याकडे झालेल्या नोंदीची माहिती १५ जूनपर्यंत न भरल्यास आगामी गाळप हंगामाकरिता ऊस गाळप परवाना दिला जाणार नाही, असा इशारा साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला आहे.
महा ऊस नोंदणी अॅपवर माहिती इंग्रजीमध्ये भरणे बंधनकारक आहे. ज्यामध्ये मोबाइल नंबर, आधार नंबर, सर्व्हे नंबर, खाते क्रमांक आदींचा समावेश आहे. माहितीतील शेतकऱ्यांची नावे व अन्य माहिती मराठीमध्येच भरायची आहेत. माहिती भरून एक्सेल शीट तयार झाल्यावर प्रथम सेव्ह करून ऊस नोंद माहितीची एक्सेल शीट अपलोड करण्याबाबत कारखान्यांची कार्यशाळाही आयुक्तालयातर्फे घेण्यात आली आहे.
हंगामात ऊस उत्पादन, गाळप, साखर उत्पादनाच्या अचूक अंदाजासाठी ऊस नोंद क्षेत्राची माहिती नोंदवणे गरजेचे आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील गावनिहाय सभासदांचे ऊस नोंद क्षेत्र, बिगर सभासदांचे ऊस नोंद क्षेत्र, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादकांचे करारांतर्गत ऊस नोंद क्षेत्र, राज्याबाहेरील ऊस उत्पादकांच्या करारांतर्गत ऊस नोंद क्षेत्राची माहिती नोंदवणे आवश्यक आहे. साखर आयुक्तालयाने त्याबाबतच्या सूचना कारखान्यांना दिल्या आहेत.