पुणे : यंदा राज्यात दुष्काळी स्थितीत उसाच्या नव्या लागवडीत घट झाली आहे. परिणामी पुढील वर्षी, हंगाम २०२४-२५ मध्ये साखर कारखान्यांना गाळपासाठी उसाची उपलब्धता यंदाच्या १,०२२ लाख टनांवरून घटून ६०० ते ६५० लाख टन एवढीच राहण्याची दाट शक्यता आहे. पुढील हंगाम शंभर दिवसांच्या आत संपू शकतो. त्यामुळे उसाच्या खोडवा, निडव्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज आहे, असे मत दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
‘डीएसटीए’च्या मुख्यालयातील चर्चासत्रात उपस्थित मान्यवरांनी आगामी हंगाम खडतर असेल अशी शक्यता वर्तविली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. योगेंद्र नेरकर, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, ऊस पैदासकार व डीएसटीएच्या कृषी समितीचे सह निमंत्रक डॉ. सुरेश पवार, कृषी रत्न डॉ. संजीव माने, डीएसटीआयचे शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, डॉ. निळकंठ मोरे, डॉ. भरत रासकर आदी उपस्थित होते. खताळ यांनी सांगितले की, पुढील वर्षी राज्यातील उसाचे उत्पादन ६०० ते ६५० लाख टनांपर्यंत कमी येईल. गाळप हंगाम ७० दिवसांपेक्षा जास्त दिवसही चालणार नाही. त्यामुळे सर्व साखर कारखान्यांनी उसाचा खोडावा, निडवा व्यवस्थापनाला महत्त्व द्यायला हवे.