पुणे : राज्यात सुरू हंगामात झालेली प्रत्यक्ष ऊस लागवड आणि शेतकऱ्यांकडून ठेवण्यात येणाऱ्या खोडवा पिकाखालील क्षेत्र किती राहील, यावरच पुढील वर्षासाठी एकूण ऊस पिकाखालील क्षेत्राचा निश्चित आकडा समोर येईल. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्य सरकारच्या आर्थिक पाहणी २०२४-२५ च्या अहवालातून मात्र राज्यात ऊस पिकाखालील क्षेत्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत चालूवर्षी सुमारे अडीच लाख हेक्टरहून अधिक घटल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षीचा हंगाम २०२३-२४ मध्ये ऊस पिकाखालील असलेले क्षेत्र १४.३७ लाख हेक्टर होते. तर २०२४- २५ मध्ये हेच क्षेत्र घटून ११.६७ लाख हेक्टरपर्यंत खाली आले आहे. सध्या साखरेचा प्रति क्विंटलचा दर ३८००च्या आसपास आहे. घाऊक बाजारात एस ३० ग्रेड साखरेचा प्रति क्विंटलचा दर ४१०० रुपयांपर्यंत आहे.
सध्या २०० पैकी १०५ कारखाने ऊस संपल्याने बंद झाले असून एकूण ८१७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. अद्यापही ९५ कारखान्यांकडून ऊसगाळप सुरू आहे. हंगाम संपल्यानंतर खोडव्याचे चित्र समोर येईल. मागील वर्षी असलेल्या दुष्काळाचा फटका यंदाच्या एकूण ऊस उपलब्धता घटण्यावर झालेला आहे. तरीही सुरु हंगामात झालेली नवीन लागवड आणि हंगाम संपल्यानंतर, प्रत्यक्षात उसाचे खोडव्याखाली राहणारे क्षेत्र किती राहणार यावरच पुढील हंगामातील म्हणजे ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या गाळप हंगामासाठी किती ऊस उपलब्ध राहिल याचा अंदाज येईल. याबाबत विस्माचे व्यवस्थापकीय संचालक अजित चौगुले म्हणाले की, राज्यात यंदा पाणी उपलब्धता चांगली असून सुरू हंगामातील ऊस लागवडीस त्याचा फायदा झाला आहे. साखरेचे दर वधारल्याने शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपीची रक्कम देण्यास कारखान्यांना मदत होणार आहे. साखरेच्या किमान विक्री दरात वाढ आणि इथेनॉलच्या दरात वाढ करावी, अशी साखर उद्योगाची मागणी आहे.