पुणे : राज्यात सद्यस्थितीत ६७ कारखाने सुरू असून आतापर्यंत १४० साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपल्यामुळे हंगाम समाप्त झाला आहे. हंगामात १० कोटी ४९ लाख टन उसाचे गाळप होवून १०७.३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात सरासरी साखर उतारा १०.२३ टक्के आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे राज्यात कोल्हापूर विभागाने ऊस गाळप, साखर उत्पादन, ऊस उताऱ्यात अव्वल स्थान कायम ठेवले आहे. कोल्हापूर विभागाने २३९.५ लाख टन ऊस गाळप केले असून सर्वाधिक ११.५५ टक्के उताऱ्यानुसार २७६.७ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे.
कोल्हापूर विभागातील ४० पैकी २६ कारखाने बंद झाले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पुणे विभाग असून, कारखान्यांनी २३१.८ लाख टन उसाचे गाळप करून २४२.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार केले आहे. सोलापूर विभागातील हंगाम येत्या आठवड्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. विभागात २१३.८७ लाख टन उसाचे गाळप झाले असून २००.६९ लाख क्विंटल साखर उत्पादन तयार झाले आहे. अहमदनगर विभागात १३६.८६ लाख टन, छत्रपती संभाजीनगर विभागात ९६.८४ लाख टन आणि नांदेड विभागात ११६.८८ लाख टन ऊस गाळप झाले आहे.