कोल्हापूर : राज्यात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संथ गतीने सुरू आहे. सोमवारी, ता. १२ फेब्रुवारीअखेर केवळ ४ साखर कारखान्यांचा हंगाम संपला. गेल्या वर्षी समान कालावधीत १३ कारखाने बंद झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत उत्पादन ७ लाख टनांनी कमी झाले आहे. मजूर टंचाईमुळे यंदा कारखाने रडतखडत सुरू आहेत असे चित्र पश्चिम महाराष्ट्रात दिसून येत आहे. पूर्वनियोजित अंदाजानुसार फेब्रुवारी अखेरीस हंगाम संपेल अशी शक्यता होती. पण या कालावधीत केवळ ४ कारखाने बंद झाल्याने आणखी एक महिना तरी हंगाम चालेल, अशी शक्यता आहे.
सोमवारअखेर ७७५ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. ९.७९ साखर उताऱ्याने ७६ लाख टन साखर तयार झाली आहे. २०७ साखर कारखाने सध्या गाळप करत आहेत. गेल्या वर्षी या कालावधीत २१० कारखाने सुरू होते. गेल्या वर्षी याच कालावधीत ८५० लाख टन उसाचे गाळप झाले होते. ९.८१ साखर उताऱ्याने ८३ लाख टन साखर निर्मिती झाली होती. सध्या, छत्रपती संभाजीनगरमधील २, सोलापूर व नांदेडमधील प्रत्येकी एक कारखाना बंद झाला आहे. ऊस गाळपासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः कारखाना व्यवस्थापनाची मनधरणी करावी लागत आहे. त्यामुळे ऊस पट्ट्यात अस्वस्थता आहे. यंदा उत्पादन घटल्याने गळीत हंगाम लवकर संपेल असा अंदाज होता. मात्र उलटी परिस्थिती आहे. राज्यात १९ लाख टन साखर तयार करत कोल्हापूर विभाग राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. पुणे व सोलापूर विभाग १६ लाख टन तर नगर विभागात ९ लाख टन साखर तयार झाली आहे.