पुणे : इंधन विपणन कंपन्यांनी चालू इथेनॉल वर्षामध्ये राज्याताल १३२ कोटी लिटर पुरवठ्याचे उद्दिष्ट दिले आहे. राज्यातून आतापर्यंत ७५ कोटी लिटरचा इथेनॉल पुरवठा झाला आहे. मात्र इथेनॉल उत्पादन क्षमता वाढली असताना साठवणुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. कारखान्यांना इथेनॉल साठवणुकीसाठी मळीप्रमाणे स्वतंत्र टाक्यांची व्यवस्था करावी लागेल अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
ॲग्रोवनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर आयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले की, कारखान्यांकडून सध्याच्या पुरवठा निश्चि असला तरी गरजही अधिक आहे. त्यामुळे राज्यात उत्पादित इथेनॉल विक्रीची हमी आहे. मात्र, इतर अडचणी येत आहेत. कारखान्यांमधून इथेनॉल घेऊन गेलेल्या टॅंकरना इंधन कंपन्यांच्या आगारात लांबलचक रांगेत थांबावे लागते. परिणामी कारखान्यांकडे नंतर तयार झालेले इथेनॉल वाहतुकीसाठी टँकर नाहीत. साठवणुकीच्या टाक्याही नसल्याने इथेनॉल प्रकल्पांचे पुरवठा नियोजन विस्कळीत झाले आहे.
याबाबत सुत्रांनी सांगितले की, इंधन कंपन्या इथेनॉल तत्काळ स्वीकारत नाहीत. त्यांच्याकडेही साठवण टाक्यांचा अभाव आहे. त्यामुळेच इथेनॉल उत्पादन व पुरवठा नियोजन कोलमडत आहे. दरम्यान ३१ ऑक्टोबरला संपणाऱ्या इथेनॉल वर्षात ५७ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करणे शक्य आहे. मात्र गाळप हंगाम समाप्त झाल्यामुळे इथेनॉल निर्मिती मंदावली आहे.
यंदाच्या हंगामात ४५ कोटी लिटर इथेनॉल तयार होण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ३६ कोटी लिटर उत्पादन झाले आहे. हंगाम लवकर संपला. पुरेसा ऊस कारखान्यांना मिळाला नाही. त्यामुळे ऊस रस व पाकापासून कमी इथेनॉल तयार झाले. या श्रेणीत अजून चांगल्या प्रमाणात इथेनॉल तयार होण्यास वाव आहे. किमान ९० टक्के उद्दिष्टपूर्ती शक्य असल्याचे साखर आयुक्तालयातील सुत्रांनी सांगितले.