पुणे : सध्या ईशान्य मान्सून सक्रिय असल्याने आणि अरबी समुद्रातील बाष्प येत असल्याने महाराष्ट्रात पाऊस होत आहे. त्यामुळे अनेक भागांत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नैऋत्य मान्सून आणि अरबी समुद्राकडून येणारे बाष्प या दोन्ही वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. राज्यातून नैऋत्य मान्सून परत गेला असला, तरीही पाऊस पडत असल्याने खरीप हंगामातील तयार पिकांचे नुकसान होत आहे. ऊस पिकाला आणि गळीत हंगामालाही याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात ‘दाना’ चक्रीवादळ २४ ते २५ ऑक्टोबरला ओडिशाच्या किनारपट्टीवर तयार होणार आहे. मात्र त्याचा प्रवास उत्तर दिशेने होईल. त्यामुळे त्याचा काहीही प्रभाव महाराष्ट्रावर होणार नाही अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सध्या दक्षिण भारतामध्ये पाऊस सुरू आहे, तसेच महाराष्ट्रातही पाऊस पडत आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात २३ ऑक्टोबरनंतर ‘दाना’ चक्रीवादळ येणार आहे. मात्र, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना पुढील आठवड्यात दिलासा मिळणार असून, हवामान कोरडे राहणार आहे. हवामानाची प्रणाली पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची, तसेच २२ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत तीव्र होण्याची शक्यता आहे, तसेच २३ ऑक्टोबरपर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होईल. त्यानंतर, ते उत्तर पश्चिम दिशेने सरकून २४ ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीपासून वायव्य बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे २३ ते २५ ऑक्टोबरदरम्यान ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.