पुणे : राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. यामध्ये २०३ सहकारी आणि २०४ खासगी साखर कारखाने होते. नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू झालेला साखर गाळप हंगाम १४ मे रोजी संपला असून विदर्भातील मानस अॅग्रो या साखर कारखान्याने सर्वांत शेवटी आपले गाळप थांबवले आहे. मात्र, अजूनही अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. जवळपास ६२ साखर कारखान्यांकडे एफआरपी थकीत आहे.
राज्यात गाळप केलेल्या २०७ साखर कारखान्यांपैकी केवळ १४५ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. उर्वरित ६२ साखर कारखान्यांकडे रक्कम थकीत आहे. हंगामात एकूण १,०७५ लाख टन उसाचे गाळप झाले. त्यासाठी वाहतूक आणि तोडणी खर्चासह ३३,९४७ कोटी रुपये शेतकऱ्यांना देणे अपेक्षित होते. त्यापैकी कारखान्यांकडून ३३,२४५ कोटी रुपये वाटण्यात आले. शेतकऱ्यांना ९७.९३ टक्के एफआरपी मिळाली असून कारखान्यांकडे ७०२ कोटी रुपये थकीत आहेत.