पुणे : महाराष्ट्रात ऊस गाळपाने वेग घेतला आहे. पण कोल्हापूर विभाग वगळता इतर कोणत्याही विभागातील साखरेचा सरासरी उतारा १० टक्क्यांच्या वर नाही. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२३-२४ मध्ये ७ जानेवारीअखेर कोल्हापूर विभागात सरासरी उतारा १०.४२ टक्के आहे. तर पुणे विभागात ९.३५ टक्के, नांदेड विभागात ९.०१ टक्के आणि अहमदनगर विभागात सरासरी साखर उतारा ८.८९ टक्के आहे. अमरावती विभागाचा साखर उतारा ८.७९ टक्के, सोलापूर विभागात ८.३८ टक्के, औरंगाबाद विभागात ७.८ टक्के आणि नागपूर विभागात सर्वात कमी ३.४७ टक्के सरासरी साखर उतारा आहे. सध्या राज्याचा सरासरी उतारा ९.१ टक्के आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत राज्याचा सरासरी उतारा ९.४६ टक्के होता.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात २०२३-२४ च्या हंगामात ७ जानेवारीपर्यंत एकूण १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९७ सहकारी आणि १०० खाजगी साखर कारखान्यांचा समावेश असून एकूण 483.2 लाख टन उसाचे गाळप झाले आहे. राज्यात आतापर्यंत सुमारे ४३९.८६ लाख क्विंटल (४३.९८ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामात २०२ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी ५६६.९७ लाख टन उसाचे गाळप करून ५३६.५४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते.