महाराष्ट्र : शेतकऱ्यांकडून उसावर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढतोय

पुणे : महाराष्ट्राला कृषी क्षेत्रातील देशातील आघाडीवरचे राज्य म्हणून ओळखले जाते. राज्यातील शेतकरी आपल्या शेतात नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये ऊस उत्पादक शेतकरीही आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात शेतकऱ्यांकडून उसावर औषध फवारणीसाठी ड्रोनचा वापर वाढू लागलाय. काही साखर कारखान्यानीही ड्रोनच्या वापरासाठी पुढाकार घेतलाय. भविष्यात मजूर टंचाईला पर्याय समजल्या जाणाऱ्या ड्रोनचा वापर आणखी वाढणार आहे.

एक एकर क्षेत्रात या कामासाठी मनुष्यबळाचा वापर करून तीन तास लागतात. मात्र, ड्रोनद्वारे दहा मिनिटांत फवारणी केली जाते. एकरी ७०० ते ८०० रुपये या दराने ही फवारणी केली जात आहे.पूर्वी हातपंपाने तासंतास औषध फवारणी केली जात होती. त्याला पर्याय म्हणून पंपांना बॅटरी बसविण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट काही प्रमाणात कमी झाले. वेळेचीही बचत झाली. परंतु ड्रोनच्या वापरामुळे हे काम आणखी कमी वेळात होऊ लागले. ड्रोनला एकूण सहा पाती असून त्यालाच पंखेही बसविण्यात आले आहेत. मशीनखाली १० लिटरची एक टाकी आहे. त्याला बॅटरी बसविली आहे. एकदा बॅटरी चार्ज करून लावल्यानंतर सुमारे तीन तास फवारणी करण्यात येते. रिमोटच्या साह्याने पिकांवर ड्रोनद्वारे फवारणी केली जाते. या प्रयोगामुळे शेतकरी सुखावले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here