महाराष्ट्र : ऊसाच्या समस्येबाबत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची शक्यता

पुणे : सरकार आणि प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत केली जात आहे. मात्र, महाराष्ट्रात अतिरिक्त ऊस गाळपाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. राज्य सरकार शंभर टक्के ऊस गाळपाचे प्रयत्न करीत आहे. सरकारने सर्व ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना यासंदर्भात साशंकता आहे. त्यामुळे आता शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मराठवाडा विभागाप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातही अतिरिक्त उसाची समस्या निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील पुणतांबा गावातील शेतकऱ्यांनी ऊस आणि इतर पिकांबाबतच्या मुद्यांवर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, सरपंच धनंजय धनवटे यांनी सांगितले की, याबाबत पुणतांबा ग्रामपंचायतीत बैठक झाली. त्याआधी शेतकऱ्यांची एक बैठक झाली आहे. त्यामध्ये किसान क्रांती मोर्चाच्या अंतर्गत ऊसाशी संबंधीत मुद्यांवर आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. यावर्षी अधिक पावसामुळे ऊसाचे क्षेत्र वाढले आहे. मात्र, कारखान्यांकडून गाळप करण्यास अडचणी येत आहेत. ज्या शेतकऱ्यांचा ऊस शेतात आहे, त्यांना राज्य सरकारने २ लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी केली आहे. धनवटे यांनी सांगितले की, २३ मे रोजी आमची ग्रामसभा होईल. त्यामध्ये याविषयीची रणनीती तयार केली जाईल. केकेएमच्या बॅनरखाली २०१७ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here