पुणे : वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटची नुकतीच ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत गुळ उद्योगावर साखर कारखान्यांप्रमाणे निर्बंध आणण्यासाठी सरकार विचाराधीन आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र, त्याला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध आहे. या धोरणाविरोधात भाजपचे शिरूर तालुका अध्यक्ष एकनाथ शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागण्याची तयारी चालवली आहे.
याबाबत अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, याबाबत एकनाथ शेलार यांनी सांगितले की, साखरसम्राटांना स्वतःची मक्तेदारी तयार करून लहान-मोठे गूळ उद्योग बंद करण्याचे हे एक षड्यंत्र आहे. गुळ उद्योगामुळे शेतकऱ्यांचा ऊस वेळेत जास्त दरात गाळपासाठी जाऊन दुसरे पीक घेतले जाते. असा निर्णय घेऊन सरकार व अजित पवार हे शेतकऱ्यांचा रोष ओढवून घेतील. शेतकऱ्यांच्या विरोधातील, शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, यासाठी शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन देणार आहोत.