पुणे : दरवर्षी दसऱ्यापूर्वी अथवा दसऱ्यापासून राज्यात साखर हंगामाला सुरुवात होते. आता यंदा दसऱ्याला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र, साखर कारखाने एक महिना उशिराने सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हंगाम उशिरा सुरू झाला, तर राज्यातील लाखो टन ऊस वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह या क्षेत्रातील संघटना आक्रमक होऊ लागल्या आहेत. कारखान्यांची धुराडे सुरू केले नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची भेट घेवून त्यांना निवेदन देण्यात येत आहे.
कारखाने लवकरात लवकर सुरू न केल्या आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश गडगे, प्रकाश बनकर आदींनी दिला आहे. शेतकरी संघटनांनी सोमवारी श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. जयशिवराय शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणपत डुंबरे, अखिल भारतीय शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील, सह्याद्री शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश शिंदे, पुणे मनसे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष योगेश तोडकर, जुन्नर सह्याद्री शेतकरी संघटनेचे जुन्नर युवक आघाडी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सचिन थोरवे, उपाध्यक्ष मनोज शिंदे महिला शेतकरी संघटना प्रतिनिधी लीनाताई गडगे, शेतकरी दत्तात्रय बनकर आदी उपस्थित होते.