पुणे : हंगाम संपुष्टात येऊनही राज्यातील ६२ साखर कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांच्या उसाच्या एफआरपीचे ७२० कोटी रुपये दिलेले नाहीत. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये २०७ कारखान्यांनी १० कोटी ७५ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापोटी शेतकऱ्यांना ऊस तोडणी वाहतूक खर्चासह ३३ हजार ९४७ कोटी रुपये देणे होते. कारखान्यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांना ३३ हजार २४५ कोटी रुपये जमा केलेले आहेत. देय एफआरपीच्या ९७.९३ टक्के रक्कम शेतकऱ्ऱ्यांना मिळाले आहेत. प्रत्यक्षात 702 कोटी रुपये अद्यापही देणे बाकी आहे. याबाबत साखर आयुक्तालयाकडून संबंधित कारखान्यांवर कारवाईची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
राज्यातील १४५ कारखान्यांनी शेतकऱ्यांना शंभर टक्के बिले दिली आहेत. तर ४८ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के रक्कम दिली आहे. आठ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एफआरपी दिली असून सहा कारखान्यांनी ० ते ५९ टक्के रक्कम दिलेली आहे. एकूण ६२ कारखाने अद्यापही देय थकीत एफआरपी रक्कमेच्या यादीत आहेत. दोन कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाणपत्रानुसार (आरआरसी) जप्तीच्या कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत.