मुंबई : राज्यात उसासह कापूस, सोयाबीन, भात, कांदा आणि मक्का या सहा पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. राज्य सरकार एआय संदर्भात सर्व्हे करून धोरण आखणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. साखर संकुलातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) सभागृहात ‘कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर’ या विषयावरील बैठकीत पवार यांनी ऊस शेतीत ‘एआय’ तंत्र वापरून पाण्याची पन्नास टक्के बचत होत आहे. उसामध्ये एआय वापरासंदर्भात राज्याच्या अर्थसंकल्पात ५०० कोटी रुपयांची तरतूद दोन वर्षांसाठी केली आहे, असे सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि मायक्रोसॉफ्टच्या एआय तंत्रज्ञानात कृषी शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, काही खासगी कंपन्या या तंत्रज्ञान क्षेत्रात उतरल्या आहेत. मे महिन्यापर्यंत एआय तंत्रज्ञाना- बाबतच्या सर्व गोष्टी तयार केल्या जातील. एआय तंत्रज्ञानामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना समाविष्ट करता येईल, याची चाचपणी सुरू आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, जिल्हा बँकांमार्फत निधी देणार आहोत. उसाबाबत आम्ही त्रिपक्षीय करार करणार आहोत. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानासाठी कंपन्या येत आहेत. त्याचे धोरण तयार करताना अटी व शर्ती टाकण्यात येतील. शेतकऱ्यांची लुबाडणूक यामध्ये होऊ नये, यासाठी मार्गदर्शन करण्याची कृषी विभागाची भूमिका आहे. यावेळी ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, प्रधान कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, राज्य सह. बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर, कृषी आयुक्त सुरज मांढरे, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ, सहकार आयुक्त दीपक तावरे आदी उपस्थित होते.