पुणे : राज्यात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु होण्यास अद्याप दीड ते दोन महिन्याचा अवधी असला तरी गुळ उत्पादनाला मात्र प्रारंभ झाला आहे. शासनाच्या स्तरावर शेतीशी निगडित पूरक व्यवसाय करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहन, मार्गदर्शन, तसेच तंत्रज्ञान, अनुदान उपलब्ध करून दिल्यास महाराष्ट्रात शेतकरी प्रोड्यूसर कंपन्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतात. खामगळवाडी (ता. बारामती) येथील जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्यूसर कंपनीने गूळ निर्मिती कारखान्याच्या माध्यमातून याचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे, असे प्रतिपादन मुंबई दुरदर्शन केंद्राचे कार्यक्रम अधिकारी भारत हरणखुरे यांनी केले. जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्यूसर कंपनी लि. बारामती आणि मुंबई दूरदर्शन केंद्राची शनिवारी दूरदर्शन कृषी सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी हरणखुरे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोगेश्वरी किसान समृद्धी प्रोड्यूसर कंपनीच्या प्रमुख सौ. स्वाती अरविंद शिंगाडे होत्या. जागेश्वरी गुळ कारखान्याचा ऊस गळीत हंगाम शुभारंभ भारत हरणखुरे यांच्यासह वरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रम अधिकारी हरणखुरे म्हणाले,” शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे या उद्देशाने बारामतीचे अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे कार्य उल्लेखनिय आहे. याचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा. सहाय्यक आयुक्त डॉ. शितल नवले, डॉ. देशमुख, डॉ. गावंडे, अरविंद शिंगाडे, एनवायरमेंट डिपार्टमेंटचे जनरल डायरेक्टर डॉ. सुनिल कांबळे, डॉ. भिकाने यांच्यासह राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन विभागाचे शास्त्रज्ञ, नारायणगाव व जालना कृषी विज्ञान केंद्र प्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.