कोल्हापूर: चालू गळीत हंगामात राज्याची वाटचाल उच्चांकी साखर उत्पादनाच्या दिशेने सुरू आहे. कारखान्यांनी आतापर्यंत ९०० लाख टन उसाचे गाळप केले आहे. यासोबतच कारखाने गेल्या दशभकातील ऊस गाळप आणि साखर उत्पादनाचा उच्चांक मोडण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत.
साखर आयुक्त कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील साखर कारखान्यांनी २४ मार्चपर्यंत ९३९ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून ९७९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. गेल्या दशकात २०१८-१९ मध्ये सर्वाधिक गाळप करण्यात आले होते. त्यावेळी ९५३ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले होते. तर तत्पूर्वी २०१६-१७ मध्ये उसाचे सर्वात कमी गाळप झाले होते. त्यावर्षी फक्त ३७३ लाख टन ऊस गाळपास आला होता. दुष्काळासारख्या स्थितीमुळे शेतकरी ऊस पिकापासून दूरच राहिले होते.
गेल्यावर्षीच्या गळीत हंगामात राज्यात १५ मार्च अखेर ४६४ लाख टन उसाचे गाळप झाले होते. मात्र गेल्यावर्षी यंदाच्या तुलनेत गाळप हंगामात सहभागी कारखान्यांची संख्या कमी होती. गेल्यावर्षी फक्त १४४ कारखान्यांनी गाळप केले. मात्र, यंदा ही संख्या वाढून १८८ वर पोहोचली आहे. साखर उद्योगातील तज्ज्ञ पी. जी. मेढे यांनी सांगितले की, यंदा चांगल्या पावसामुळे आणि उसाचे बंपर उत्पादन झाल्याने गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या वाढली आहे. राज्यात यंदा ११ लाख हेक्टरवर ऊस पिक होते. तर गेल्यावर्षी ते कमी म्हणजे फक्त ८ लाख हेक्टरवर होते.
राज्यातील साखर हंगाम यंदा ९५३ लाख टनाचा उच्चांक मोडण्यास कारखाने सज्ज आहेत. अद्याप अनेक कारखाने गाळप करण्यास तयार आहेत. चालू हंगामात गाळपासाठी परवाना घेतलेल्या १८८ पैकी फक्त ६१ कारखान्यांचे गाळप बंद झाले आहे.