मुंबई : महाराष्ट्रात २०२०-२१चा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मंगळवारपर्यंत १० कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले. फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत एकूण २३६७.४६ कोटी रुपयांची थकबाकी ऊस उत्पादकांची आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील साखर कारखान्यांनी ७४४.६२ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे.
राज्यात १८७ कारखान्यांपैकी ९७ कारखान्यांनी हफ्त्यांमध्ये एफआरपीचे पैसे देण्यासाठी शेतकऱ्यांसोबत करार केला आहे. त्यानुसार राज्यात दिला जाणारा एकूण एफआरपी १६२७५.६८ कोटी रुपये आहे. मात्र कारखान्यांनी १३,९१७.३८ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. तर २३६७.४६ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप आहे. एकूण १८७ कारखान्यांपैकी ७४ कारखान्यांनी १०० टक्के एफआरपी दिली आहे. तर ११३ कारखाने अद्याप पैसे देण्यास असमर्थ ठरले आहेत.
गेल्या दोन गळीत हंगामात राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांसोबत हफ्त्यांमध्ये एफआरपी देण्याबाबत करार करीत आहेत. बहूतांश कारखान्यांनी ऊस मिळाल्यानंतर चौदा दिवसांमध्ये एफआरपीपैकी ७५-८० टक्के पैसे दिले आहेत. तर उर्वरीत पैसे पुढील हंगाम सुरू होण्यापूर्वी हफ्त्यांमध्ये दिले जाणार आहेत. साखर आयुक्त आणि शेतकऱ्यांना उशीरा पैसे देण्यासह व्याजाच्या कारवाईपासून हा पर्याय सोपा असल्याचे कारखानदारांचे म्हणणे आहे.