पुणे : यंदा पाऊस पुरेसा पडल्याने राज्यभरात ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. त्यामुळेच सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाल्याची नोंद कृषी खात्याकडे झाली आहे. यंदा जून महिन्याच्या शेवटी-शेवटी ऊस लागवडीला सुरुवात झाली. त्यानंतरही पाऊस पडत राहिल्याने ऊस लागवडही सुरू आहे. त्यामुळेच ऊस लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ६४ हजार हेक्टर, साताऱ्यात ३१ हजार हेक्टर, सोलापूर व सांगली जिल्ह्यात प्रत्येकी २३ हजार हेक्टर, अहमदनगर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर, तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ हजार हेक्टरवर आडसाली ऊस लागवड झाली आहे.
यंदा जून महिन्यापासून राज्यभरात विशेषतः ऊस लागवड होणाऱ्या पट्टयात चांगला पाऊस पडला आहे. मागील वर्षी पीक जोपासण्याइतकाही पाऊस पडला नाही. त्यामुळे इतर पिके तर गेलीच होती, शिवाय उसालाही फटका बसला होता. यंदाच्या चांगल्या पावसाने दोन लाख हेक्टर आडसाली ऊस लागवड झाली आहे. याबाबत सांगलीतील ऊस अभ्यासक डॉ. अंकुश चोरमुले यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी नवीन व सुधारित जातीचा ऊस लावावा, एकरात ऊस मोजण्यापेक्षा एकरात अधिक वजन मिळावे यावर लक्ष द्यावे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेऊन उर्वरित शेतात इतर पिके घेता येतात. आमच्याकडे एकरी १४० टन उत्पादन घेणारे शेतकरी आहेत. तसे प्रयत्न वाढायला हवेत.