मुंबई : चीनी मंडी
येत्या साखर हंगामात महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा दहा टक्के कमी साखर उत्पादन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पावसाने दिलेली ओढ आणि पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव यांमुळे उसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. परिणामी साखर उत्पादनातही घट होण्याचा धोका आहे.
वेस्टर्न इंडिया शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, ‘आगामी हंगामात महाराष्ट्रात होणाऱ्या संभाव्य साखर उत्पादनात दहा टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. साखर उत्पादन १०० लाख टनांच्या खाली उतरण्याची शक्यता आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाडा, सोलापूर, अहमदनगर आणि खान्देशात राज्यातील एकूण ऊस उत्पादन १५ ते २० टक्क्यांनी घटण्याचा धोका आहे.’
काही दिवसांपूर्वी इंडियन शुगर मिल असोसिएशनने २०१८-१९मध्ये महाराष्ट्रात साखर उत्पादन ३ ते ७ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता. चालू हंगामातील १०७.१५ लाख टन उत्पादनावरून राज्याचे उत्पादन ११० ते ११५ लाख टनापर्यंत जाईल, असा असोसिएशनचा अंदाज होता.
राज्यातील काही भागात पावसाने दिलेली हुलकावणी आणि सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर परिसरात उसाला लागत असलेली पांढऱ्या अळीची कीड यांमुळे असोसिएशनने नव्याने सर्वेक्षण करून ऊस उत्पादनाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. राज्याच्या साखर आयुक्तालयाकडून हेक्टरी ऊस उत्पादनाबाबत अंदाज सांगण्यात आला. त्यात सरसरी प्रति हेक्टर ९० टनाचे उत्पादन आता ५ ते १० टक्क्यांनी घटण्याची भीती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या अभावामुळे मराठवाड्यात उसाचे क्षेत्रच कमी होण्याची शक्यात आहे. त्याचवेळी कोल्हापूर परिसरात अतिरिक्त पाऊस झाला आहे आणि सोलापुरात पांढऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. या सगळ्याच परिणाम ऊस उत्पादनावर होताना दिसत आहे. अतिरिक्त साखर उत्पादनामुळे संकटात सापडलेल्या साखर उद्योगासाठी ऊस उत्पादन घटणार ही स्वागतार्ह बाब मानला जात आहे.