मुंबई: महाराष्ट्राचा गाळप हंगाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील साखर कारखान्यांमधील गाळप बंद झाले आहे.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील साखर हंगाम ३१ मे पर्यंत संपण्याची शक्यता आहे. साखर आयुक्तालयाच्या आकडेवारीनुसार, १५ एप्रिलअखेर १८८ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात ९९३.७४ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०४१.५४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.
यापू्र्वीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात १०५-१०७ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. उसाची उपलब्धता आणि गाळपाची सुरुवात या आधारावर महाराष्ट्रातील ऊस हंगाम १०० दिवसांपेक्षा अधिक असेल अशी शक्यता आहे. जादा ऊस उत्पादन झाल्याने सरासरी गाळप हंगाम १२० ते १३० दिवसांच्या दरम्यान राहीला आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील साखर कारखाने सर्वात शेवटी बंद होत आहेत. कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील कारखान्यांनी आधीच हंगाम आटोपता घेतला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला आहे तर काही कारखाने अंतिम टप्प्यात आहेत. राज्यात १४० साखर कारखाने बंद झाले आहेत.