कोल्हापूर : राज्यामध्ये साखर उत्पादनामध्ये कोल्हापूर विभाग अग्रेसर ठरला आहे. साखर उत्पादनात राज्यात कोल्हापूर विभागाने आघाडी घेतली असून, या विभागातील आतापर्यंतचे साखर उत्पादन हे सर्वाधिक २०७.१९ लाख क्विंटल इतके झाले आहे. कोल्हापूर विभागामधील साखर कारखान्यांनी आतापर्यंत २ कोटी ९२ लाख टन उसाचे गाळप करत ११.२६ उतारा मिळवला आहे. तर राज्यातील २०७ कारखान्यांनी ८०६. १५ लाख टन उसाचे गाळप करत ७९४.४८ लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे.
साखर उत्पादनात पुणे विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असून, या विभागात आतापर्यंत १७४.७६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्यात यंदाच्या हंगामात साखर कारखान्यांनी ७२ लाख ३७ हजार क्विंटल साखर उत्पादन करून ७४ लाख ३२ हजार मे. टन ऊस गाळप केले आहे. तर गेल्यावर्षी २१० सहकारी, खासगी कारखान्यांनी गत हंगामामध्ये ८८०, ४८ लाख टन उसाचे गाळप करत ८६६.८५ लाख क्विंटल साखर उत्पादित केली होती. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत हंगाम चालेल, असा अंदाज आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे आडसाली व पूर्वहंगामी उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यामुळे पुढील हंगामात उसाचे क्षेत्र कमी होण्याची शक्यता असून, पुढील हंगामासाठी गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.