कोल्हापूर : चालू हंगामात कोल्हापूर विभागाने २२९ लाख टन ऊस गाळप आणि २६ लाख टन साखर उत्पादनासह राज्यात आघाडी घेतली आहे. याचबरोबर कोल्हापूर विभागाने साखर उताऱ्यात निर्विवाद वर्चस्व मिळवत ११.१२ टक्के साखर उतारा मिळवाला आहे. पुणे विभागाने १०.८ टक्के साखर उताऱ्यासह २.२ मिलियन टन साखर उत्पादन केले आहे.
सोलापूर विभागाने ८.९५ टक्के साखर उताऱ्यासह २० लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. २३ मार्चअखेर, १४५ कारखान्यांनी आपला गळीत हंगाम आटोपता घेतला. गेल्यावर्षी याच कालावधीत केवळ २३ कारखाने बंद झाले होते. पुणे, नगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड विभागातील ९० टक्के गळीत हंगाम समाप्त झाला आहे. नागपूर विभागातील सर्व कारखाने बंद झाले आहेत. नागपूर विभाग चालू हंगाम संपवणारा पहिला विभाग बनला आहे. सोलापूर विभागातील ५० कारखान्यांपैकी ४४ बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागातील ३६ पैकी ३५ कारखाने बंद झाले आहेत.
२३ मार्चअखेरपर्यंत राज्यात १०३९ लाख टन ऊस गाळप आणि ९.९६ टक्क्यांच्या सरासरीने १०.३ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ११०० लाख टन उसाचे गाळप आणि १०.३७ टक्क्याच्या सरासरी उताऱ्याने ११.४ लाख टन साखर उत्पादन झाले होते. मात्र, या वर्षी एखादा अपवाद वगळता बहुसंख्य कारखाने आपले गाळप उद्दिष्ट पूर्ण करू शकलेले नाहीत.
मार्चच्या अखेरपर्यंत कोल्हापूर, सोलापूर, अमरावती विभागातील साखर कारखाने पूर्णपणे बंद होतील. राज्यातील २१० कारखान्यांपैकी ६५ अद्याप गाळप करीत आहेत. हे कारखाने गतीने साखर उत्पादन करीत नसल्याचे दिसून येते. पुढील पंधरा दिवसात आणखी ५ ते ६ लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.