महाराष्ट्र : कोल्हापुरी गुळाची वाढली गोडी, सरासरी भाव ४,५०० रुपये प्रतिक्विंटल

कोल्हापूर : कोल्हापुरी गुळाला देशभरात मागणी असल्याने शाहू मार्केट यार्डात गुळाला चांगला दर मिळत आहे. आवकेत वाढ होऊनही दरात तेजी आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सध्या गुळाचा सरासरी भाव ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत २०० ते ३०० रुपये जादा दर असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

गेल्या काही वर्षात अपुरे मनुष्यबळ, वीज दरवाढ, वाहतुकीचा खर्च वाढता आदी कारणाने जिल्ह्यातील गुऱ्हाळ घरांची संख्या घटली आहे. यातून सध्या जेमतेम १३० गुऱ्हाळ घरांवर गुळाचे उत्पादन होते तेथे गूळ बाजारपेठेत येतो. गेल्या पाच वर्षांत गुळाला सरासरी भाव ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये होता. तो भावही परवडत नसल्याने जेमतेम उत्पादन घेऊन गुऱ्हाळ घरे हंगामात लवकर संपवली जात आहेत. यात काही गूळ उत्पादकांनी गूळ बनविताना साखर मिश्रित केल्याने भाव कमी मिळत होता. यातून व्यापारी गूळ उत्पादकांत वाद होत होते. या साऱ्यातून गूळ उद्योगाला मरगळ आली होती.

मागील २ वर्षांपासून दर्जेदार गुळाला चांगला भाव मिळत आहे. यंदाच्या हंगामात आतापर्यंत सुमारे १४ लाख ५९ हजार गूळ रव्यांची बाजारपेठेत आवक झाली. त्याचेही सौदे नियमित सुरू आहेत. गुजरातमधून कोल्हापुरी गुळाला मागणी मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. उत्तर भारतातील चंदीगड, लखनौ, हरियाणा भागातील गुळाचे उत्पादन घटले आहे. तेथील गूळ गुजरातमध्ये येण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे गुजरातमधून कोल्हापूर गुळाला मागणी आहे. त्यामुळे सौद्यात गुळाला चांगला भाव मिळण्यास मदत झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here