कोल्हापूर : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) महाराष्ट्रातील सहा सहकारी साखर कारखान्यांना 549 कोटी 54 रुपयांचे कर्ज मिळविण्यात यश आले आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार धनंजय महाडिक, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याशी निगडीत साखर कारखानदारांचा समावेश आहे.
राज्यातील आर्थिक अडचणीत सापडलेल्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांचे उसाचे पैसे देणेही मुश्कील झाले होते. महाराष्ट्रातील सुमारे दहा ते अकरा सहकारी साखर कारखान्यांशी संबंधित आणि आता भारतीय जनता पक्षात सक्रिय असलेल्या प्रमुख राजकीय नेत्यांनी गेल्या दीड ते दोन वर्षांपासून एनसीडीसीकडून कर्ज मिळवण्यासाठी पाठपुरावा केला होता. मोहोळ (सोलापूर) येथील भीमा साखर कारखान्याचे तत्कालीन चेअरमन आणि खासदार धनंजय महाडिक म्हणाले कि, केंद्र सरकारच्या एनसीडीसी विभागाने राज्यातील सहा सहकारी साखर कारखान्यांना 549 कोटी 54 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे.
पतपुरवठा करताना एनसीडीसीने साखर कारखान्यांना काही कडक अटी घातल्या आहेत. सहकारी साखर कारखान्यासह सर्वच सहकारी संस्थांना यापुढे कर्ज हवे असेल तर सहकारी संस्थांवर संचालक नेमावा लागेल, अशी अट केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगमने (एनसीडीसी) लागू केली आहे. कर्जाची परतफेड होईपर्यंत दर सहा महिन्यांनी निगमचे अधिकारी कारखान्याची तपासणी करतील. कर्जाच्या परतफेडीची संचालक मंडळाला सामूहिक हमी घ्यावी लागणार असून, तसे बंधपत्र द्यावे लागणार आहे. कर्जाचा हप्ता थकल्यास एक महिन्यात संचालक मंडळ बरखास्त करून कारखाना सरकार ताब्यात घेईल.
राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून (NCDC) कर्ज मिळवण्यासाठी भाजपच्या काही मंत्री आणि नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. यानंतर केंद्राच्या सूचनेनुसार राज्य सरकारने नऊ साखर कारखान्यांसाठी 1023 कोटी 57 लाख रुपयांचा कर्ज प्रस्ताव पाठवला, मात्र हे कारखाने कर्जाला पात्र नसल्याचे कारण देत NCDC ने हा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यानंतर राज्य सरकारने मे महिन्यात सहा कारखान्यांचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठवला होता, आणि त्यात राज्य सरकारने कर्जफेडीची हमी घेतली होती.
सहकारमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली. या समितीने दिलेल्या मान्यतेनुसार राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने नुकतेच सहकार विभागाने पाठवलेल्या सहा गिरण्यांसाठी ५४९ कोटी ५४ लाख रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मंजूर केले आहे.
…या साखर कारखान्यांना मिळाले कर्ज
शंकर सहकारी साखर कारखाना (माळशिरस) -113 कोटी 42 लाख (माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील), कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना (इंदापूर) -150 कोटी आणि नीरा-भीमा सहकारी साखर कारखाना-75 कोटी (दोन्ही कारखाने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबधित), किलारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना – 50 कोटी (भाजप आमदार अभिमन्यू पवार), भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखाना -34 कोटी 74 लाख (रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संबधित), सोलापूर जिल्ह्यातील स्थित भीमा सहकारी साखर कारखाना – 126 कोटी 38 लाख (भाजप खासदार धनंजय महाडिक) या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे.