पुणे : कृषी अर्थकारणाचा चेहरा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून बदलणे शक्य असल्याचे प्रयोगाद्वारे सिद्ध होऊ लागले आहे. बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या माध्यमातून ऊसाचे उत्पादन वाढविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्याचा देशातील पहिला प्रयोग यशस्वी झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित या तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारी ऊस शेती भविष्यात शक्य करण्याचा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा नव तंत्रज्ञानाचा प्रकल्प एक हजार शेतकऱ्यांच्या शेतावर राबविला जाणार आहे,
मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड या जगातील नामांकित कंपन्यांच्या मदतीने ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सुरू असलेल्या ‘फार्म ऑफ द फ्युचर’ या प्रकल्पाची दखल घेत मायक्रोसॉफ्ट कंपनीचे एक शिष्टमंडळ बुधवारी व गुरुवारी (ता. १८, १९) अशा दोन दिवसांच्या बारामती भेटीवर येत आहेत.सपना नौहिरा, बार्बारा टेरझीएफ, रजत अग्रवाल, निखिल मानेकर, प्रशांत मिश्रा, जॉन रायडर, मे यी चेन, पल्लवी वालिया, यशोधरा रॉय, अवंती श्रीनामे या मायक्रोसॉफ्ट, अँग्रिपायलट, ट्रायफिल्म, क्लिक टू क्लाऊड, प्रोवेज कन्सल्टिंग या कंपन्यांचे प्रतिनिधी हा प्रयोग पाहण्यासाठी येत आहेत.
ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने राज्यातील एक हजार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टया फायदेशीर व पथदर्शी असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित ऊस शेती लागवड प्रकल्प हाती घेतला आहे. ऊसापासून सुरू झालेला हा प्रयोग इतर पिकांपर्यंत विस्तारण्यात येईल. राज्यभरातील शेतकऱ्यांना यात सहभागी करून घेतले जाईल. प्रकल्पात उपग्रह तंत्रज्ञान, प्लॉट मॅपिंग, स्वयंचलित हवामान केंद्र, आयओटी सेन्सर प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने खत, पाणी व्यवस्थापन करता येते. जमिनीची सुपिकता, पोषणमूल्य आणि दर्जा टिकवता येतो. हवामान बदलामुळे पिकांवर होणारे दुष्परिणाम वेळीच रोखून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. ड्रोन तंत्रज्ञानामुळे पिकाचे आरोग्य, कीड व रोग ओळखणे, अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करता येते. कमी वेळेत जास्त क्षेत्रात फवारणी करणे शक्य होते, त्यासाठी प्रती एकर ५०० ते ७०० रुपये खर्च येतो. त्यामुळे उत्पादन खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होऊन उत्पन्न २२ टक्क्यांपर्यंत वाढत असल्याचे दिसून आले.
‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार यांनी लंडनस्थित ऑक्स्फर्डचे जागतिक तज्ज्ञ डॉ. अजित जावकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ऑक्स्फर्डसह मायक्रोसॉफ्टनेही येथे काम करण्याची इच्छा प्रदर्शित केली व त्यातून आज हा प्रकल्प साकारला आहे.या संशोधनाची पाहणी करण्यासाठी जोहान्सबर्गच्या बिझनेस स्कूलचे प्रमुख डॉ. रॅंडल कॅरोलिसन, डॉ. प्रशांत मिश्रा, मायक्रोसॉफ्टचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रणवीर चंद्रा, बिल गेट्स फाउंडेशनचे सीईओ स्टुअर्ट कॉलिस यांसारख्या मान्यवरांनी भेटी दिल्या आहे. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांना ऑक्स्फर्डने तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून आमंत्रित केले आहे. बारामतीचे तंत्रज्ञान जागतिक पातळीवर स्वीकारले जात आहे, या मागे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची दूरदृष्टी आहे.