पुणे : महाराष्ट्रातील साखर कारखाने १० नोव्हेंबरदरम्यान आपल्या पूर्ण क्षमतेने ऊस गाळप सुरू करतील अशी अपेक्षा आहे. राज्यात दरवर्षी ऑक्टोबरच्या मध्यापासून हंगामाला सुरुवात केली जाते. मात्र, पावसाने यंदा ऊस गाळपास उशीर होणार आहे. यांदरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील काही साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखान्यांचाही समावेश आहे.
PTI वृत्तसंस्थेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आतापर्यंत ७३ कारखान्यांनी गळीत हंगामासाठीची परवानगी घेतली आहे. तर गेल्या वर्षीच्या २०० साखर कारखान्यांच्या तुलनेत यंदा २०३ कारखाने गळीत हंगामात सहभाग घेतील अशी शक्यता आहे. राज्यातील ऊस उत्पादन २०२१-२२ या हंगामातील १,३२१ लाख टनाच्या तुलनेत १,३४३ लाख टनापर्यंत पोहोचेल असे अनुमान आहे. साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या १३७ लाख टनाच्या तुलनेत वाढून १३८ लाख टन होईल असा अंदाज आहे.
महाराष्ट्राने गेल्या हंगामात उत्तर प्रदेशला पाठीमागे टाकले होते. चालू हंगामातही साखर उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर राहील अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र साखर उत्पादन आणि निर्यात यामध्ये जगातील अनेक साखर उत्पादक देशांपेक्षा पुढे आहे.