पुणे :राज्यात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे.त्यामुळे ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज, सोमवारी हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे.रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली.सध्या, मॉन्सून वाटचाल अडखळली असल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
आज (ता.१७)मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील भंडारा येथे राज्यातील उच्चांकी ४१.६ अंश तापमानाची नोंद झाली. नागपूर आणि गोंदिया येथे पारा ४१ अंशांपार आहे. सध्या मॉन्सून दाखल झालेल्या भागातही पावसाने उसंत घेतली आहे.पावसाअभावी विदर्भात कमाल तापमान चाळीशीपार गेले आहे. खानदेश, पूर्व विदर्भात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी चार ते पाच दिवस वाट पाहावी लागणार आहे.