पुणे : राज्यातील साखर कारखान्यांना यंदापेक्षा पुढील वर्षी उसाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. राज्याच्या ऊस लागवडीत पुरेसा पाऊस नसल्यामुळे सलग दोन वर्षांपासून घसरण सुरू आहे. पुढील गाळप हंगाम केवळ ७०-८० दिवसांचा राहू शकतो, अशी भीती ‘डीएसटीए’च्या चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. दुष्काळामुळे घटलेल्या ऊस लागवडीमुळे खोडवा, निडव्याचे नियोजन या विषयावरील ‘डीएसटीए’च्या मुख्यालयात झालेल्या चर्चासत्रात साखर संघ व ‘विस्मा’ने आयोजिलेल्या या चर्चासत्राला माजी कुलगुरू डॉ. वाय. एस. नेरकर, कृषिरत्न शेतकरी शास्त्रज्ञ संजीव माने, ‘डीएसटीए’चे मानद सचिव एम. आर. कुलकर्णी व कार्यकारी सचिव गौरी पवार उपस्थित होते.
संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांच्या मतानुसार, पुढील वर्षी राज्याचे ऊस उत्पादन ६००-६५० लाख टनापर्यंत घसरल्यास गाळप हंगाम ७० दिवसांपेक्षा जास्त चालू शकणार नाही. चालू हंगामापेक्षाही पुढील हंगामातील ऊस उपलब्धता घटू शकते. दुष्काळी स्थिती बघता ऊस पिकाचे उत्पादन व उत्पादकतेवर यंदा प्रश्नचिन्ह आहे. ठिबक, तुषार व इतर तंत्र वापरून उत्पादकता टिकवावी लागेल. खोडवे, निडवे ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायला हवे. ऊस पैदासकार डॉ. सुरेश पवार यांनी सांगितले की, ‘यंदा ऊस उत्पादकता हेक्टरी ९० टनांपेक्षाही खाली जाईल व साखर कारखाने १०० दिवसांच्या आसपास चालतील. मात्र अवर्षण स्थितीमुळे पुढील हंगामात उसाची अतिटंचाई तयार होईल. त्यामुळे नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या सर्वच उसाचा खोडवा ठेवायला हवा. यापूर्वी प्रत्येक दुष्काळात खोडव्यानेच साखर उद्योगाला तारले आहे.