हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
पुणे : चीनी मंडी
अतिरिक्त उत्पादनाच्या डोकेदुखीने त्रस्त महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी मदार आता केवळ साखर निर्यातीवरच आहे. महाराष्ट्रातील साखरेला पारंपरिक उत्तर प्रदेशची मोठी बाजारपेठ मिळत होते. मात्र, ही बाजारपेठ आता न राहिल्याने अतिरिक्त साखर निकाली काढण्यासाठी साखर कारखान्यांना केवळ निर्यातीचाच पर्याय निवडावा लागत आहे.
महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती फारशी समाधानकारक नाही. राज्यात गेल्या वर्षी प्रमाणेच उच्चांकी साखर उत्पादन होण्याची चिन्हे आहेत. त्यातच पारंपरिक उत्तर प्रदेश आणि एकूणच उत्तर भारतातील बाजारपेठ आता, महाराष्ट्राकडे राहिलेली नाही. त्यामुळे अतिरिक्त साखरेचे करायचे काय, असा प्रश्न साखर कारखान्यांपुढे येऊ शकतो.
गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशने महाराष्ट्राला मागे टाकत देशातील सर्वांत मोठे साखर उत्पादक राज्य होण्याचा मान मिळवला आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खटाळ म्हणाले, ‘उत्तर प्रदेशमधील साखर कारखान्यांनी गेल्या काही वर्षांत उत्तर भारतातील आणि ईशान्येकडील बाजारपेठ काबीज केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साखरेला आता त्या बाजारांमधून मागणी नाही. गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेशामधील सरासरी साखर उत्पादन ६५ लाख टनावरून १२० लाख टनापर्यंत गेले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी महाराष्ट्राची पारंपरिक उत्तर भारतातील बाजारपेठ काबीज केली. उत्तर प्रदेशातून त्या बाजारपेठेतील ट्रकद्वारे लवकरात लवकर साखर मिळत आहेत. तसेच, महाराष्ट्रातून रेल्वेने जाणाऱ्या साखरेच्या तुलनेत उत्तर प्रदेशचे पॅकिंगही दर्जेदार आहे. उत्तर प्रदेशातील साखर कारखाने चांगली साखर खालच्या दरात विकत असल्याची तक्रार महाराष्ट्रातील साखर कारखाने करत आहेत.’
मुळात महाराष्ट्राला वर्षाला केवळ २४ ते २५ लाख टन साखरच लागते. गेल्या हंगामात राज्यात १०७ लाख टन साखर उत्पादन झाले होते. तर, यंदाच्या हंगामाची ९६ लाख टन साखरेची भरही पडली आहे. त्यामुळे साखर कारखाने अतिरिक्त साखरेच्या ओझ्याखाली आहेत. या संदर्भात खटाळ म्हणाले, ‘सध्याची परिस्थिती अतिशय चिंतेची आहे. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनावर कसे नियंत्रण आणायचे हाच प्रश्न आहे. कारण, अतिरिक्त उत्पादनाचा आणि साठ्याचा केवळ महाराष्ट्रालाच बसत आहे. त्यामुळे आता आम्हाला साखर निर्यातीवरच भर दिला पाहिजे.’ दरम्यान, महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी २८ फेब्रुवारीपर्यंत एफआरपीच्या एकूण रकमेपैकी ७३ टक्के रक्कम अदा केली आहे.
डाउनलोड करा चीनीमंडी न्यूज ॲप: http://bit.ly/ChiniMandiApp