मुंबई : महाराष्ट्रात २०२१-२२ या ऊस गळीत हंगामाने आता अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ६ साखर कारखान्यांनी आपले कामकाज बंद केले आहे. राज्यात साखरेचे उच्चांकी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. साधारणतः १२० लाख टनावर साखर उत्पादन होईल असे अनुमान व्यक्त करण्यात आले आहे. हे उत्पादन राज्यात आजवरचे सर्वोच्च असेल.
साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ९ मार्च २०२२ पर्यंत महाराष्ट्रात १९७ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९८ सहकारी तर ९९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०१२.०७ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत १०४४.०६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.३२ टक्के आहे.
ऊसाचे कोठार मानल्या जाणाऱ्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मार्चच्या अखेरपर्यंत हंगाम समाप्त होण्याची अपेक्षा आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पुणे आणि सातारा येथील कारखाने बंद होतील. तर मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर आणि नाशिकमधील कारखाने मे अखेरपर्यंत सुरू राहतील अशी अपेक्षा आहे. मराठवाड्याील शेतकऱ्यांनी ऊस क्षेत्रात अनेक पटींनी वाढ केली आहे. त्यामुळे कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध आहे. राज्यात प्रती एकर उत्पादकतेमध्येही वाढ दिसून आली आहे.
साखर आयुक्त कार्यालयाने सुरुवातीला दिलेल्या अनुमानानुसार १०५६ लाख टन ऊस गाळपासाठी ऊपलब्ध होईल अशी शक्यता वर्कविण्यात आली होती. राज्याचा साखर उतारा १०.३० टक्के आणि सरासरी रिकव्हरीवर १०८ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता. यामध्ये इथेनॉल उत्पादनासाठी १२-१५ लाख टन साखर डायव्हर्शनचा समावेश होता.
मात्र, सध्या २६० लाख टनापेक्षा अधिक ऊस मराठवाड्यात गाळपाविना आहे. साखर उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात साखर उत्पादन १२० लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. हे उत्पादन साखर उद्योग सुरू झाल्यापासून सर्वोच्च असेल.
इस्माने आपल्या दुसऱ्या सुधारित अनुमानामध्ये ११७ लाख टनाच्या तुलनेत २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन १२६ लाख टनापर्यंत होईल अशी शक्यता वर्तविली आहे.