महाराष्ट्र : यंदाच्या हंगामात केवळ ३७ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन

पुणे : केंद्र सरकारच्या इथेनॉल निर्मितीच्या धोरणानंतर साखर कारखान्यांनी त्यावर भर दिला आहे. इथेनॉल निर्मितीमुळे साखर कारखान्यांना जास्त नफा मिळत असून शेतकऱ्यांनाही त्याचा फायदा होत असल्याचे चित्र आहे. पण यंदा केंद्राने निर्बंध घातल्यामुळे इथेनॉलचे उत्पादन कमी झाले आहे. या गाळप हंगामात राज्यात केवळ ३७ कोटी लीटर इथेनॉल निर्मिती झाली आहे. गेल्यावर्षी, इथेनॉल वर्ष २०२२-२३ मध्ये १०३ कोटी लीटर इथेनॉलची निर्मिती झाली असून ते पेट्रोलियम कंपन्यांना देण्यात आले आहे.

राज्यामध्ये १३६ इथेनॉलचे प्रकल्प असून त्यापैकी ४६ सहकारी साखर कारखान्यांनी आणि ५० खासगी साखर कारखान्यांनी इथेनॉलचे प्रकल्प उभारले असून राज्यात ४० स्टँड अलोन युनिट इथेनॉलचे आहेत. तर या १३६ इथेनॉल प्रकल्पामधून ३१५ कोटी लीटर इथेनॉल निर्मिती क्षमता आहे. चालू गाळप हंगामात मात्र डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना मोठा फटका बसला आहे. २०१८ साली केंद्र सरकारने इंधनामध्ये तब्बल २० टक्के इथेनॉल मिसळवण्याचा निर्धार करून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिले. बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली गेली. त्याचबरोबर इथेनॉल प्रकल्पासाठी अनुदान आणि कर्ज देण्याच्या योजनाही सुरू केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here