महाराष्ट्र : थकीत एफआरपीप्रश्नी राज्यातील २९ कारखाने ‘रडार’वर

पुणे : यंदा उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत (एफआरपी) थकीत ठेवणाऱ्या साखर कारखान्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील २९ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या एफआरपीचे ५३९ कोटी रुपये थकवले आहेत. याबाबत साखर आयुक्त अनिल कवडे यांनी संबंधित कारखान्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी येत्या मंगळवारी (दि. २०) साखर संकुलमध्ये सुनावणी ठेवली आहे.

राज्यात ३१ जानेवारीअखेर साखर कारखान्यांना ऊसतोडणी वाहतूक खर्चासह देय रक्कम १७ हजार ६३३ कोटी रुपये होती. त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर १६ हजार १२६ कोटी (९१.४५ टक्के) रक्कम जमा केली आहे; तर एफआरपीचे १ हजार ५०७ कोटी रुपये थकीत आहेत.

चालू वर्षाच्या हंगामात प्रथमच थकीत एफआरपीप्रश्नी सुनावण्या घेण्यास सुरुवात होत आहे. बाजू ऐकून घेतल्यानंतर संबंधित कारखान्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये १३ खासगी आणि १५ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे.सर्वाधिक सात साखर कारखाने अहमदनगर जिल्ह्यातील असून सोलापूर सहा, सांगली तीन, सातारा तीन यांच्यासह छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, बीड, नागपूर, हिंगोली, भंडारा, धाराशिव, यवतमाळ, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका कारखान्याचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here