महाराष्ट्रातील गाळप हंगामाने आता गती घेतली आहे. साखर आयुक्तालयाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, १३ नोव्हेंबर २०२१ अखेर राज्यात एकूण १२९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ६२ सहकारी तर ६७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आणि ९०.२२ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ७६.६६ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सद्यस्थितीत राज्याचा साखर उतारा ८.५ टक्के इतका आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा) म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामातील ११.४८ लाख हेक्टर ऊस क्षेत्र ११ टक्क्यांनी वाढून २०२१-२२ या हंगामात १२.७८ लाख हेक्टर जाले आहे. राज्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. यासोबतच राज्याच्या सर्व विभागातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. इथेनॉलसाठी जर ऊस वळवला गेला नाही तर महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामात साखर उत्पादन जवळपास १२२.५ लाख टन होऊ शकते असा अंजाद इस्माने वर्तविला आहे.