पुणे : राज्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखाने साखर उत्पादनापेक्षा इथेनॉल उत्पादनांवर अधिक भर देत आहेत. कारखान्यांनी आपले लक्ष इथेनॉल निर्मिती प्रकल्पांकडे वळविले आहे. केंद्र सरकार ने ही इथेनॉल उत्पादनासाठी पाठबळ दिले आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात १६३ इथेनॉल निर्मिती प्रकल्प कार्यान्वित आहेत. या प्रकल्पांतून दरवर्षी सुमारे २४४ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती होत आहे.
सकाळमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, महाराष्ट्रातील साखर उद्योगाची इंधन निर्मितीकडे दमदार वाटचाल सुरू आहे. आधीच्या दोन वर्षाच्या तुलनेत गेल्या वर्षी इथेनॉल उत्पादनात १८ कोटी लिटरची वाढ झाली. राज्यात दोन वर्षांपूर्वी २२६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले होते. त्यामध्ये वाढ होऊन आता २०२२-२३ मध्ये उत्पादन २४४ कोटी लिटरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच चालू आर्थिक वर्षातही इथेनॉल उत्पादनाची सरासरी कायम आहे.
राज्यात १६३ इथेनॉल उत्पादन प्रकल्प असून त्यापैकी ५४ प्रकल्प सहकारी साखर कारखान्यांचे आहेत. तर ७१ प्रकल्प खासगी साखर कारखान्यांचे आहेत. शिवाय, स्वतंत्र असे ३८ प्रकल्प आहेत. राज्यातील इथेनॉल उत्पादन प्रकल्पात सध्या २१,३७१ कोटी रुपयांची गुंतवणूक झालेली आहे. यंदाच्या ऊस गळीत हंगामात साखर कारखान्यांनी १६ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वर्ग केली. पूर्वी कारखान्यांमध्ये केवळ साखर उत्पादन होत होते. आता वीज, आसवनी (डिस्टिलरी), इथेनॉल, बायोगॅस आदींसह सुमारे ३५ उपपदार्थांची निर्मिती करणे शक्य झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली. सोयाबीननंतर ऊस राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे पीक बनले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानंतर गॅसोलीन तयार होते. आगामी चार ते पाच वर्षांत गॅसोलिन वापराचे प्रमाण आपल्याकडे वाढेल अशी शक्यता आहे.