पुणे : राज्यात यंदाच्या २०२४-२५ च्या चालू गाळप परवान्यासाठी आतापर्यंत २०३ साखर कारखान्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये आतापर्यंत १०१ सहकारी व १०२ खासगी कारखान्यांनी परवान्याकरिता अर्ज दाखल केले आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात ११.६७ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. मात्र साखर आयुक्तालयाने खासगी संस्थेकडून मागवलेल्या अहवालात उपलब्ध ऊस १३.७० लाख हेक्टरच्या पुढे असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे यंदा किमान १२३५ लाख टनाच्या आसपास गाळप होऊ शकेल.
आणखी चार ते पाच साखर कारखान्यांकडून गाळप परवान्यासाठी अर्ज दाखल होऊ शकतो. गळीत हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू करावा असे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी होणार असल्याने त्यानंतर हंगाम सुरू करावा अशी मागणी राजकीय पक्षांनी केली होती. त्यास साखर उद्योगातून तीव्र विरोध करण्यात आला आहे. हंगाम लवकर सुरू व्हावा असे प्रयत्न कारखानदारांनी सुरू केले आहेत. दरम्यान, राज्यात गेल्या हंगामात २०८ कारखान्यांनी परवाना घेतला होता. त्यातून १०७६ लाख टनांचे गाळप होऊ शकले. कारखान्यांनी गेल्या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३६,६०० कोटींहून अधिक रक्कम रास्त व किफायतशीर दरापोटी (एफआरपी) वाटली आहे. यंदा साधारणतः १२ लाख टन साखर इथेनॉलसाठी वळवली जाईल. तर ११३ लाख टनांच्या आसपास राज्यात साखर तयार होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. राज्य शासनाने गाळपाच्या तारखेबाबत कोणताही खुलासा अद्याप केलेला नाही. मात्र, गाळप परवान्यासाठी अर्ज केलेल्या साखर कारखान्यांच्या कागदपत्रांची साखर आयुक्तालयात सुरू आहे.